अवैध रेतीतस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरने युवतीला चिरडले

50

अवैध रेतीतस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरने युवतीला चिरडले
फरार चालकास नागरिकांनी पकडून चोप दिला; मृतकाच्या आईकडून महसुल अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

प्रतिनिधी | बुलडाणा
जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील पिंप्री कोळी – सावरगाव नेहू मार्गावर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने १५ वर्षीय मुलीला चिरडले. त्यामुळे तिचा जागीच ठार झाला. घटने पश्चात वाहन चालक फरार झाला, मात्र संतप्त नागरिकांनी त्याचा पाठलाग करून पकडले व चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना नुकतेच घडली.

 


मिळालेल्या माहितीनुसार, सावरगाव नेहू येथील रहिवासी वंदना संजय खंडारे वय ३० या आपल्या मुलगी गायत्री खंडारे वय १५ हिच्यासह सकाळी शौचास गेल्या होत्या. दोघी परत येत असताना एक बिननंबर ट्रॅक्टर जो रेतीची अवैध वाहतूक करीत होता त्याने दोघींना जोरदार धडक दिली. या अपघातात वंदना रस्त्याच्या कडेला पडल्या, तर ट्रॅक्टरने गायत्रीला चिरडले. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
धडक झाल्यानंतर चालक ट्रॅक्टर घेऊन पसार झाला. मात्र घटनेने हादरलेल्या वंदना यांनी आरडाओरड केली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तत्काळ एकत्र येत चालकाचा पाठलाग केला आणि त्याला पकडून चोप दिला. नंतर आरोपीस पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
या घटनेने परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. मृतकाची आई वंदना खंडारे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत या अपघाताला अवैध रेती तस्करी कारणीभूत असल्याचा आरोप केला असून, संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार व एसडीओ हे या अनागोंदीला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. योग्य तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणी शेख सईद शेख सलीम रा. वडोदा, ता. मलकापूर या ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.