मेहकर नगरपरिषद कार्यालयात संशयास्पद आग; हजारो कागदपत्रे भस्मसात

30

मेहकर : मेहकर नगरपरिषद कार्यालयातील रेकॉर्ड रूमला शनिवारी (३ मे) पहाटेच्या सुमारास संशयास्पद आग लागली. सध्या अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू असतानाच लागलेल्या या आगीमुळे विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून, ही घटना संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

या आगीत नागरिकांच्या मालमत्तेसंदर्भातील हजारो महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ही नगरपालिका प्रशासनाची अक्षम्य दुर्लक्षामुळे घडलेली घटना असल्याचे मानले जात आहे.

आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीचा भडका वाढत गेल्याने तातडीने पोलिस, अग्निशमन दल आणि नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. संबंधित सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले.

पालिका बंब बंद, लोणारकडून मदत

मेहकर नगरपरिषदेचा मुख्य अग्निशमन बंब तांत्रिक बिघाडामुळे बंद असल्याने लोणार नगरपरिषदेचा अग्निशमन बंब पाचारण करण्यात आला. यासोबत मेहकरचा छोटा बंबही घटनास्थळी दाखल झाला आणि अखेर आग नियंत्रणात आणण्यात आली.

महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक

नगरपरिषदेच्या कार्यालयाचे नूतनीकरण सुरू असल्यामुळे अनेक महत्त्वाची कागदपत्रे तात्पुरत्या स्वरूपात रेकॉर्ड रूममध्ये ठेवण्यात आली होती. मात्र, या आगीत ती सर्वच कागदपत्रे भस्मसात झाली. यापूर्वीही ३१ मार्च २०२२ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात अशीच आग लागून कागदपत्रांची हानी झाली होती. त्यामुळे यावेळची आगही संशयास्पद ठरत आहे.

या घटनेबाबत पोलिस आणि महावितरण कंपनीला पत्राद्वारे माहिती देण्यात आली आहे. महावितरणचे अधिकारी पंचनामा करून आगीचे नेमके कारण स्पष्ट करतील, अशी माहिती मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी दिली.

दरम्यान, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी नागरिकांतून मागणी होत आहे.