बुलढाण्यात कॅण्डल मार्च ; समाजमन एकवटले

27

बुलढाण्यात कॅण्डल मार्च ; समाजमन एकवटले

‘हिट ॲण्ड रन ‘वरील बंदी उठविण्याची शासनाकडे मागणी

बुलढाणा, ब्युरो

शहरातील त्रिशरण चौकात (दि.10) फेब्रुवारीला दुपारी बारा वाजता स्नेहल चौधरीचा बोलेरो पिकअपने चिरडल्याने दुर्दैवी अंत झाला. दारू पिवून सतीश बाहेकरने भरधाव वाहन चालविल्याने अपघात घडला. या घटनेचे तीव्र पडसाद जिल्हाभर उमटले. अशातच आरोपीला झालेली अटक आणि सुटका ही दुसरी दुर्दैवी घटना बुलढाणेकरांनी अनुभवली. त्यामुळेच समाजमन एकवटले. या घटनेचा निषेध म्हणून कॅण्डल मार्च काढण्यात आला.

स्नेहलला न्याय मिळण्यासाठी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच ‘हिट अॅण्ड रन’ वरील बंदी उठविण्यासाठी शासनाला निवेदन सादर करण्यात आले. बुलढाणेकरांच्या वतीने चांडक लेआऊट ते त्रिशरण चौकापर्यंत कॅण्डल मार्च काढून दिवंगत स्नेहल चौधरीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या ठिकाणी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. निवेदनामध्ये स्नेहल चौधरीच्या मारेकऱ्यांना अटक करा. वास्तविक घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद आहे. त्यानुसार भारतीय न्यायसंहिता तसेच मोटार वाहन अधिनियम कायद्याच्या प्रचलित कलमानुसार गुन्हे दाखल करून कारवाई करावी. (दि.1) जुलै 2024 पासून हिट अॅण्ड रन कायद्यावर लावण्यात आलेली बंदी त्वरित हटवावी. शहरातील प्रत्येक चौकात वाहतूक पोलीस नियुक्त करावे, यासह विविध मागण्यांसाठी स्नेहल चौधरीचा परिवार तसेच सर्वपक्षीय व संघटनांच्या प्रतिनिधींनी (दि.14) फेब्रुवारीला सकाळी जिल्हा प्रशासनामार्फत मुख्यमंत्री, गृह सचिव, सचिवांना निवेदन देत कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई न झाल्यास आक्रोश निषेध मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला.