केंद्रीय आरोग्य मंत्र्याच्या जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा आजारी

63

केंद्रीय आरोग्य मंत्र्याच्या जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा आजारी
चार टेक्निशियन दोन महिन्यापासून रिकामे, तरी वेतन सुरळीत 

जिल्हा सामान्य रुग्णालयात दोन महिन्यांपासून मशीन धूळखात

 

दिनेश मुडे| बुलडाणा

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय राज्यमंत्री पदी बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना संधी मिळाली आहे. सध्या जाधव हे देशाचा कारभार पाहत आहेत, परंतू त्यांच्या स्व जिल्हयातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील एमआरआय व सीटीस्कॅन मशिन आजारी पडली आहेत. मागील दोन महिन्यापासून हे मशिन धूळखात असल्याने रुग्णालयात या उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना कोणत्याही प्रकारची सुविधा मिळत नसल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या सोबतच त्यांची खासगी रुग्णालयात आर्थिक पिळवणूक ही होत असल्याने नागरिकात प्रचंड नाराजीचे वातावरण आहे.
खासगी ठिकाणी परवडत नसल्याने ग्रामीण भागातील मंडळी मोठ्या प्रमाणात आज ही सरकारी रुग्णालयात धाव घेते. परंतू या ठिकाणी सिटी स्कॅन व एमआरआय सुविधा नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत होते. अनेक संघटना, पक्ष व नेत्यांच्या वतीने वारंवार मागणी करण्यात आल्यावर आरोग्यमंत्री च्या आदेशाने जिल्हा सामान्य रुग्णालयात सदर मशीन मंजूर करण्यात आली. जिल्हा सामन्य रुग्णालयात मोठा गाजावाजा करुन एमआरआय व सीटी स्कॅन मशीन आणण्यात आली होती. यासाठी विशेष कक्ष देखील विशेष देखरेखीत बनवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या मशीनला ऑपरेट करण्यासाठी बाहेर जिल्ह्यातून चार तंत्रज्ञ बुलडाण्यात नियुक्त करण्यात आले. सदर मशिन अद्यावत असून ॲटोमॅटीक असल्याने बुलडाणा जिल्हयातील नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळेल अशी आशा होती, परंतू मागील दोन महिन्यांपासून सदर कर्मचारी नियमितपणे रुग्णालयातील आपल्या कक्षात उपस्थित राहतात. परंतू काम सुरु करण्याची परवानगीच देण्यात आली नसल्याने सदर कर्मचारी दिवसभर रिकामेच बसून असतात तर एमआरआय करण्यासाठी आलेल्या रुग्णांना खाजगी रुग्णालयाचा मार्ग दाखवला जात असल्याने त्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. तर दुसरीकडे सदर कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार मात्र नियमितपणे दिला जात असल्याने नागरिकात प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. सदर विषयाकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी लक्ष्य द्यावे अशी मागणी नागरिकात आहे.

 

 

लालफीतशाही अडकली मशीन….

अनेकवेळा आंदोलने व मागण्या केल्यावर मंजूर झालेल्या एमआरआय व सीटीस्कॅन मशिनचे इंन्स्टालेशन पुर्ण करण्यात आले आहे. सदर मशिन अत्याधुनिक व ऑटोमॅटिक अशी आहे. या मशीनसाठी पाहिजे तसा कक्ष तयार देखील करण्यात आला आहे, टेक्निशियन तयार आहे, जिल्हा सामान्य रुग्णालयात कोणतीही अडचण नाही, तरी ही केवळ वरिष्ठस्तरवरुन मंजूरी मिळाली नसल्याने सदर काम सुरु करण्यात आले नसल्याची माहिती आहे.

 

बुलडाण्यात दररोज २५ रुग्ण….

बुलडाणा शहरातील विविध रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात मिळून दररोज किमान २५ ते ३० रुग्णांना डॉक्टर एमआरआय सांगितला जातो. खासगी मध्ये सदर एमआरआयसाठी सुमारे ५ ते ८ हजार रुपये चार्ज घेतला जातो. जिल्हा सामान्य रुग्णालयात सदर मशिन सुरु झाली तर गरीबांना तेवढीच सुविधा उपलब्ध होवू शकते, त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्यांच्या नजरा याकडे लागल्या आहे.

 

एका आठवड्यात सुरु होईल…..

सदर रुग्णालयात सिटी स्कॅनची सुविधा सुरु आहे, एमआरआय संदर्भात इंस्टालेशन व वरिष्ठ स्तरावरील काही आदेश बाकी आहे. वरिष्ठस्तरवर या संदर्भात दोनवेळा पत्र व्यवहार केला आहे, पुढील आठवड्यात पर्यत सदर सेवा सुरु होईल. -दत्तात्रय बिराजदार, जिल्हा शल्य चिकित्सक बुलडाणा.

 

आमदार संजय गायकवाड यांनी केला पाठपुरावा….

जिल्हा सामान्य रुग्णालयातील एमआरआय मशीन बंद असल्याची तक्रार काही रुग्णांनी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडे केली असता त्यांनी या संदर्भात आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी संपर्क साधून संबंधित अधिकाऱ्यांना या बाबत आदेश देण्याची मागणी केली. यावर मंत्री आबिटकर यांनी सकारात्मक उत्तर दिले.