देऊळगावराजा : खडकपूर्णा नदीपात्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर रेती वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी महसूल विभागाने मोहिम उघडली असून, गेल्या दोन दिवसांत चार टिप्पर जप्त करण्यात आले आहेत. ही वाहने देऊळगावराजा व अंढेरा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या खडकपूर्णा नदीपात्रात गेल्या काही काळापासून अवैध उत्खनन व रेती वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. महसूल पथक याला रोखण्यासाठी सातत्याने कार्यवाही करत असून, याअंतर्गत अनेक बोटी जिलेटिनच्या साहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. यासोबतच अनेक टिप्परही जप्त करण्यात आले आहेत.
अवैध रेती तस्करीस काही प्रमाणात स्थानिक पातळीवरून मिळणाऱ्या सहकार्यामुळे तस्करांचे मनोबल वाढल्याचे निरीक्षण आहे. मात्र महसूल विभागाने कठोर भूमिका घेत कारवाया सुरू ठेवल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून ३० एप्रिल रोजी रात्री दोन टिप्पर देऊळगावराजा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. त्यानंतर २ मे रोजी अंढेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक टिप्पर व असोला जहांगीर परिसरातून आणखी एक टिप्पर जप्त करण्यात आला.
या सर्व प्रकरणांमध्ये संबंधितांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई सुरू आहे.
कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी:
या संयुक्त मोहिमेमध्ये तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, नायब तहसीलदार सायली जाधव, मंडळ अधिकारी रामदास मांटे, तलाठी पंढरी जायभाये, बरांडे, आकाश खरात, तेजस शेटे, कोतवाल कविता खरात, रामप्रसाद शेरे यांच्यासह महसूल विभागाचे इतर कर्मचारी सहभागी झाले होते.