बोरगावात रातोरात बसविला छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा
अज्ञातांविरुद्ध अमडापूर पोलिसात गुन्हा दाखल
प्रतिनिधी | अमडापूर
चिखली तालुक्यातील अमडापूर पोलिस ठाणे हद्दीतील बोरगाव काकडे येथे ग्रामपंचायतीच्या मोकळ्या जागेत अज्ञात व्यक्तींनी रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा बसविला. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध अमडापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा १८ मार्च रोजी नोंदविण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव काकडे गाव हे शांतताप्रिय गाव आहे. गावात कोणतेही टोकाचे वाद नाहीत व सर्व नागरिक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. मात्र, १८ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी ग्रामपंचायतीच्या मोकळ्या मैदानात छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा बसविला.
याची माहिती मिळताच ग्रामपंचायत सचिव गणेश इंगळे यांनी तत्काळ गटविकास अधिकारी गजानन फेफाळे यांना कळविले. त्यानंतर गावचे सरपंच सोपान काकडे, पोलिस पाटील विजय काकडे आणि तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीधर वांजोळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
सदर पुतळा बसवण्यासाठी कोणीही शासकीय परवानगी घेतलेली नाही. तसेच पुतळा सुरक्षित नसल्याचेही गावातील नागरिकांनी सांगितले आहे. त्यामुळे गावात कोणत्याही क्षणी वातावरण तापू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
गावातील शांतता बिघडू नये म्हणून ग्रामपंचायत सचिव गणेश इंगळे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध अमडापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.