सैलानी दर्ग्याच्या सुरक्षेत वाढ: संशयास्पद चर्चेमुळे पोलिसांकडून नियमित तपासणी

16
सैलानी बाबांचा दर्गा

बुलढाणा: धार्मिक एकतेचे प्रतीक असलेल्या सैलानी बाबांच्या दर्ग्यात बॉम्ब ठेवल्याच्या अफवेने प्रशासन सतर्क झाले असून, सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी बॉम्ब शोध पथक तैनात करून परिसराची नियमित तपासणी सुरू केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई गावालगत दरवर्षी सैलानी बाबांची यात्रा भरते. यात्रेदरम्यान, दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीने पोलीस चौकीत जाऊन दर्ग्यात बॉम्ब ठेवल्याचा दावा केला. त्याने पोलिसांना सांगितले की, तो शौचासाठी बाहेर गेला असताना दोन अनोळखी व्यक्ती आपसात बोलत होत्या. त्यापैकी एकाने दुसऱ्याला सांगितले की, ‘सैलानी बाबांच्या दर्ग्यात बॉम्ब ठेवण्यात आला आहे.’
ही चर्चा ऐकताच त्या व्यक्तीला पाहून दोघे संशयित जंगलाच्या दिशेने पळाले. ही माहिती मिळताच, पातूर येथील त्या व्यक्तीने तत्काळ पोलीस चौकीत धाव घेतली आणि संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. या प्रकरणाची पोलीस अधीक्षक (एसपी) विश्व पानसरे यांनी तत्काळ दखल घेत, सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले आणि बॉम्ब शोध पथकाला तैनात केले.

बॉम्ब शोध पथकाची कारवाई

सैलानी दर्ग्यात बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती मिळताच एसपी पानसरे यांनी तातडीने बॉम्ब शोध पथक दर्ग्याकडे पाठवले.
संशयास्पद वस्तूंचा शोध घेत संपूर्ण दर्गा आणि परिसराची कसून तपासणी करण्यात आली.
गेल्या दोन दिवसांपासून दररोज सकाळ-संध्याकाळ तपासणी केली जात आहे.
८ मार्चपासून पोलिसांकडून दर्गा परिसराची नियमित तपासणी सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

“दर्ग्यात बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती मिळताच, बॉम्ब शोध पथकाने तातडीने संपूर्ण परिसराची तपासणी केली. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. ज्या व्यक्तीने पोलिसांना माहिती दिली होती, तो मानसिक रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले आहे.”
– बी. बी. महामुनी, अपर पोलीस अधीक्षक, बुलढाणा