तलाठी कार्यालयातील अनियमित कामकाजावर नागरिकांचा आक्रोश 

34

तलाठी कार्यालयातील अनियमित कामकाजावर नागरिकांचा आक्रोश

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून कारवाईची मागणी

चिखली, (श.प्र.)

येथील तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाच्या अनियमित कामकाजामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाविरोधात भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण तुकाराम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

निवेदनात केल्याप्रमाणे, नमूद चिखलीतील तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय मागील पन्नास वर्षांहून अधिक काळापासून जुने गाव चिखली येथे कार्यरत आहे. मात्र सध्या या कार्यालयातील अधिकारी हांडगे कॉम्प्लेक्स, खामगाव रोड येथे त्यांच्या खाजगी कार्यालयातून कामकाज करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना जुने गाव चिखली येथे जाऊन कामकाजाबाबत माहिती घेण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. शिपाई नसल्यामुळे कार्यालयात योग्य माहिती मिळत नाही, तसेच खामगाव रोडवरील खाजगी कार्यालयात अधिकारी भेटत नसल्याने व तेथील खाजगी कर्मचाऱ्यांकडून अरेरावीची वागणूक मिळाल्याने सामान्य नागरिक, वयोवृद्ध, दिव्यांग व विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. नियमांच्या उल्लंघनामुळे नागरिकांना होणारा त्रास थांबवण्यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय नियमित वेळेत अधिकृत ठिकाणी कार्यरत करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

 

box

अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा

या निवेदनावर गजानन हुंड्यार, मुकेश लंबे, कैलास गाडेकर, रामेश्वर चवरे, लक्ष्मण मोरे, रामेश्वर जाधव, सचिन कोकाटे, नरेंद्र मोरवाल, प्रशांत पाटील, केशव टेकाळे, विजय वायाळ व इतर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.